रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 11 जून 2020 (08:04 IST)

रोजगार संधीसमवेत त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याचे निर्देश : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात सुरू असलेल्या मेट्रोसारख्या पायाभूत सुविधांच्या विकास कामासांठी स्थानिकांना रोजगार देऊन कामे बंद पडू देऊ नका, भूमिपुत्रांना रोजगार देतानाच कामांसाठी लागणारे प्रशिक्षण देखील त्यांना द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.
 
मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आदी विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी मंत्रालयात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व  संजय बनसोडे, मुख्य अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे राज्यभरात लॉकडाऊन झाले, आता मुंबई महानगर परिसर, पुणे वगळता राज्यात अन्य ठिकाणी उद्योग सुरू झाले आहेत. मात्र मजुरांची आणि कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. परराज्यातील मजूर त्यांच्या गावी गेले आहेत. ते जेव्हा परत येतील तोपर्यंत त्यांच्यावर विसंबून न राहता विकास कामांसाठी लागणारे कुशल, अकुशल कर्मचारी, मजूर यांची विभागवार यादी करा. त्याचबरोबर कोणत्या विभागात रोजगार उपलब्ध आहे याचाही तपशील घ्या आणि राज्यभर कुशल मनुष्यबळ उपलब्धतेसाठी जाहिराती द्या. खास करून जेथे जेथे मेट्रोची कामं सुरू आहेत तेथे मोठ्या प्रमाणावर जाहिराती द्या. त्यामुळे राज्यातील भूमिपुत्रांना रोजगार मिळेल. सुरूवातीच्या काळात या भूमिपुत्रांना काही काळ प्रशिक्षण देण्याची व्यवस्था देखील करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
 
राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या समन्वयातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विकासकामे करतांना त्याचा प्राधान्यक्रम ठरवा. पावसाळा सुरू होत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे काही ठिकाणी सुरू असलेली विकासकामे बंद आहेत, अशा वेळी प्रमुख शहरांमध्ये कुठलीही अडचण, पूरस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. तातडीने डेब्रिज उचलणे, ड्रेनेज पाईप दुरुस्ती करणे आदी कामांवर लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.  यावेळी मुंबई मेट्रो, पुणे, नागपूर, नाशिक मेट्रोचे सादरीकरण करण्यात आले.